पुणे : सायबर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चुकीची माहिती देत, खात्यावरून पैसे उकळणे, नोकरी देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक करणे या प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यक्ती त्याचप्रमाणे राजकारणी देखील या गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडिया खात्यावर अश्लील मजकूर लिहिल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, संबंधित आरोपींचे मोबाइल संच पोलिसांनी जप्त केले आहेत.
याबाबत पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पाटील, खुळे आणि कणसे यांचे मोबाइल संच जप्त केले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडिया खात्यावर अश्लील मजकूर लिहिल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. या तपासात विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील यांनी अश्लील मजकूर लिहून टीका केल्याचे उघड झाले. तांत्रिक तपासात रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील नावाने खाते चालविणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जयंत पाटील याला नोटीस बजावून जबाब नोंदविण्यात आला असून, त्याच्या मोबाइल जप्त करण्यात आला आहे. वसंत खुळे, प्रदीप कणसे यांना देखील नोटीस बजावली असून, त्यांचे मोबाइल संच जप्त केले आहेत.
शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनुने, उमा पालवे आदींनी ही कारवाई केली. समाजमाध्यमात महिलांविषयी बदनामीकारक, तसेच अश्लील मजकूर लिहिणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. महिलांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.