इंदापूर(पुणे) : छगन भुजबळ यांची आज पुण्यातील इंदापूर तालुक्यात भव्य सभा पार पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भुजबळांची पहिली ओबीसी एल्गार सभा असणार आहे. इंदापूर शहरातील प्रशासकीय भवना शेजारील प्रांगणात या भव्य सभेच आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानावर तसेच शहरातील अनेक भागांत ओबीसीचे भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळांचे बॅनर लावण्यात आले आहेत. हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे.
दरम्यान, या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास दीड लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. जालना आणि हिंगोलीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे.
ओबीसींचे भावी मुख्यमंत्री
पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ओबीसी एल्गार मेळावा पार पडत असून या मेळाव्यात ओबीसींचा बुलंद आवाज छगन भुजबळ, एकच पर्व ओबीसी सर्व तसेच ओबीसींचे भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ अशा आशयाचे फलक मेळाव्याच्या ठिकाणासह इंदापूर शहरात झळकत आहेत. यामुळे या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या मैदानावर जरांगेंची सभा, त्याच मैदानावर भुजबळांची सभा
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी इंदापूर शहरालगत असलेल्या शंभर फुटी मैदानात मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडली होती, त्याच मैदानात छगन भुजबळ यांचा ओबीसी मेळावा होत आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. अशातच आज ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता, आता त्याच ठिकाणच्या सभेतून भुजबळ हे जरांगे पाटील यांच्याबाबत काय बोलणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे. (Manoj Jarange Patil)
सभेची जोरदार तयारी
समोरील भव्य प्रांगणामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोठे स्वागत फलक लावण्यात आले आहेत. वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली असून, तब्बल तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी समाजबांधवांकडून करण्यात आले आहे.
सभेला ‘या’ नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्यास छगन भुजबळ यांच्यासह माजी आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, अॅड. बबनराव तायवाडे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, नाभिक समाजाचे बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्यासह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या ठिकाणची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. या ठिकाणी नवीन नगरपरिषदेच्या इमारतीच्या नजीक मोठा शामियाना उभारला आहे.