दीपक खिलारे
Indapur News: इंदापूर : ओबीसी आरक्षण समर्थनार्थ व आरक्षण रक्षणार्थ तालुक्यातील ओबीसी बांधवांचे शनिवारी (दि.11) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी आरक्षण बचाव समितीचे पांडुरंग शिंदे यांनी दिली.
मराठा समाजाचा समावेश कुणबी प्रवर्गात व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. शासनाच्या वतीने ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांची नोंद ओबीसी प्रवर्गात होणार असल्याचे जाहीर केल्याने ओबीसी सुद्धा आक्रमक झाला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा वाद उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी बांधव सुद्धा एकत्र येत असल्याचे दिसत आहे. ओबीसींच्या समर्थनार्थ राज्यभर तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत बैठकांच्या आयोजन चालू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातही ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
पांडुरंग शिंदे पुढे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये. सरकारी नोकरीतील कंत्राटी तत्त्वावर पदभरती बाबतचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. सद्यस्थितीतील ५२ टक्के असलेल्या ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळावे. केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी.
तसेच सरकारी शाळा महाविद्यालय दवाखाने व इतर संस्थांच्या खाजगीकरणाबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, यासह इतर अनेक प्रमुख मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. आपल्या न्याय हक्कासाठी इंदापूर तालुक्यातील तमाम ओबीसी बांधवांनी याबैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही पांडुरंग शिंदे यांनी केले.