योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ज्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली, अशांना चलनाच्या रकमेत तडजोडअंति ५० टक्के सूट देण्यात आली. ही रक्कम भरण्यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतून राष्ट्रीय लोकअदालत भरवण्यात आली. यात एकाच दिवसात २४७ वाहनचालकांनी आपल्या वाहनांवरील दंड भरला असून, त्यानुसार तब्बल ३,९१,८०० रुपयांची विक्रमी वसूली ही फक्त एका दिवसात झाली.
यावेळी आयोजित जिल्हा हेल्प डेस्क उपक्रमप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बागल, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बांबले, पोलिस हवालदार गणेश शेंडे, पोलिस नाईक मिलिंद देवरे, पोलिस शिपाई योगेश कांबळे, ई-चलान टेक्निशियन अमित गोजारी, प्रकाश कुकडे, लिपिक जिल्हा न्यायालय रोहन दिवे, आदित्य कोकणे, आकाश कोलते उपस्थित होते.
वाहनांवरील दंड ५० टक्के भरून दंडाची पावती लोकअदालतमध्ये मांडून वाहनचालकांना सूट देण्यात येणार असल्याने अनेकांनी दंड भरण्यास गर्दी केली होती. नागरिकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतील राष्ट्रीय लोकअदालत हा एक चांगला मार्ग आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलन
जे वाहनचालक वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करतात अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित वाहनाच्या मालकांना ई-चलन पाठवले जाते. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ई-चलनाचा मेसेज देखील येतो.
ऑनलाईन घेता येऊ शकेल चलनविषयी माहिती
आता प्रादेशिक वाहतूक कार्यालय देखील अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देत आहे. आरटीओची अधिकृत वेबसाईट echallan.parivahan.gov.in वर जाऊन आपल्या वाहनाच्या नावे काही दंड जमा आहे का हे तपासू शकता. हे सर्व ऑनलाईन असल्याने आपल्याला कुठंही जाण्याची गरज नाही. इतकेच नाहीतर घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून दंडही भरता येऊ शकतो.