गोरख कामठे
हडपसर : फुरसुंगी परिसरात मागील चार-पाच महिन्यात गावात दिसणारे मोर अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील एक वर्षापूर्वी फुरसुंगी व परिसरातील गावानजीक असलेल्या परिसरात सतत मोरांच्या आवाजाने गुंजलेला असायचा. मात्र, मागील काही दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या मोरांची संख्या कमी झाल्याचे शिवशंभु सोशल फाऊंडेशनच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार मोर पकडत असताना कोणी सापडले तर त्याला कडक शिक्षेची तरतूद आहे. मात्र, या परिसरातील काही तरुण हे मध्यरात्री, तसेच पहाटे मोराची शिकार करत असल्याचा शिवशंभु सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना दाट संशय आहे.
काही समाजकंटकांची टोळी यापैकी नेमके कोणते कारण असावे. अशी चर्चा सध्या गावात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत उर्वरीत मोरांची काळजी घेणे गरजेचे झाले असून, शिवशंभु सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्याने पुढील दोन दिवसात वनविभागाला लेखी पत्र देण्यात येणार आहे.
दरम्यान, फुरसुंगी व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी अशी कोणती व्यक्ती आढळल्यास शिवशंभु सोशल फाऊंडेशनला माहिती कळवावे. अथवा १९२६ या नंबर वर कॅाल करुन तक्रार करु शकता, असे आवाहन अध्यक्ष किरण पवार, अभिजित खराडे, संतोष हरपळे, प्रदीप चव्हाण, अमित यादव, अमित हरपळे, नरेंद्र हरपळे, प्रविण भोसले, किशोर कामठे, रवींद्र हरपळे यांनी केले.