पुणे : पुणे शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पी. एम.पी.एम.एल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाने गेल्या वर्षी ‘पुणे पर्यटन’ ही बससेवा सुरु केली होती. या बसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रशासनाने नव्या योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामध्ये आता 33 प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास 5 प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये तब्बल 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यात कुठेही मोफत फिरता येणार आहे.
दिवाळी सण येताच लोकांच्या मनात उत्साह दिसतो. बरेचजण दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जाण्याचे बेत आखतात. त्यात पुण्यात येणा-या पाहुण्यांना पुणे दर्शन घडविण्यासाठी ही सेवा फायद्याची ठरु शकणार आहे. याबरोबरच शनिवार आणि रविवार देखील सेवा सुरु राहणार आहे. तसेच प्रवासासाठी विशेष मागणी आणि बुकिंग केली असेल तर इतरच्या दिवशीही ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे समन्वयक सेवक नितीन गुरव यांनी दिली आहे.
-मार्ग : हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर (बस क्रमांक 2)
-मार्ग : हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर (बस क्रमांक 3)
-मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, नीळकंठेश्वर पायथा, डेक्कन (बस क्रमांक 4)
-मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड पायथा, पुणे स्टेशन (बस क्रमांक 5)
-मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई मंदिर, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ, पुणे स्टेशन (बस क्रमांक 7)
-मार्ग : अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी (बस क्रमांक 8)
-मार्ग : पुणे स्टेशन- डेक्कन जिमखाना, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, इस्कॉन मंदिर कोंढवा रोड, शिवसृष्टी आंबेगाव, स्वामी नारायण मंदिर नन्हे- आंबेगाव, पुणे स्टेशन.
जर काही कारणामुळे बुकिंगच्या दिवशी बससेवा रद्द झाल्यास येणा-या पुढील शनिवारी तुम्हाला त्याच तिकिटावर प्रवास करता येऊ शकतो. तसेच तुम्हाला त्याच तिकिटावर त्यादिवशी पर्यटन बस स्टॉपपासून तुमच्या घरापर्यंत इतर बसमध्ये मोफत प्रवासही करता येणार आहे. यात विशेष बाब म्हणजे सर्व पर्यटन बसेसमध्ये खास पर्यटन मार्गदर्शक व्यक्ती राहणार असून ती व्यक्ती प्रवाशांना त्या पर्यटनस्थळाविषयी माहिती देणार आहे. दरम्यान, पुण्यातील पर्यटनासाठी स्मार्ट एसी इलेक्ट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे.