पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने चांगलाच रंग पकडला आहे. राजकारणी आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अशातच अजित पवार यांनी आपल्या विरोधात उभ्या असणाऱ्या पुतण्याला जोरदार टोला लगवला आहे. मला इंग्लिश न येऊनही मी राज्याचा उपमुख्यमंत्री, साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.तसेच साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला आहे.
1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, मला 1991 ला तिकीट दिलं, आता लोकांनी काम सुरू केलं नाहीतर लगेच यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत, असं म्हणत अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर टीका केली. बारामती लोणी भापकर इथल्या सभेत अजित पवार बोलत होते.
त्यांना आता आमदारकीची स्वप्न पडतायत…
अजित पवार बोलताना म्हणाले की, “आपल्या तालुक्यातील मुलं काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या-गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नव्या चेहऱ्यांना मी पुढे आणेल.” पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितलं? 1989 ला साहेब म्हणत होते, मी अजितला तिकीट देणार नाही, 91 ला मला तिकीट दिलं. आता काही लोकांना काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत.”
मला इंग्लिश न येऊनही, मी राज्याचा उपमुख्यमंत्री..
मला इंग्लिश न येऊनही, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडेसहा लाख कोटींचं बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला, असं अजित पवार म्हणाले. तसेच, पुढे बोलताना मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे, असा पुनरुच्चारही अजित पवारांनी केला आहे.