पुणे : गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक राज्याच्या काना-कोपऱ्यातून शेगावला जातात. प्रवासात भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगारातून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ५) रात्री नऊ वाजता शेगावसाठी पहिली स्लीपर बस रवाना झाली.
शिवाजीनगर आगारातून ही बस दररोज रात्री नऊ वाजता सुटणार आहे. ती बस दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शेगाव येथे पोहचणार आहे. यासाठी प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीट दर असणार आहे. या बसला एसटी महामंडळाच्या सर्व सवलती लागू असतील, अशी माहिती मिळाली.
प्रवासी भाविकांना या बसचे आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. या बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजीनगर आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी केले आहे.