इंदापूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच इंदापूरच्या राजकीय घडामोडीमध्ये झपाट्याने बदल घडताना दिसत आहे. हर्षवधर्न पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच हर्षवधन पाटील यांच्या मुलाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला होता. आता फक्त घोषणा बाकी आहे’ अशी प्रतिक्रिया माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी दिली आहे.
काल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आज 11 वाजता हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामध्ये ते सर्व गोष्टींची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या.
काल(गुरूवारी) हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह ठेवल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आज दुपारपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.