पुणे : शेती आणि शेतीसंबंधी कामे आणखी सुलभ व्हावी, यासाठी राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मालकाच्या आधार क्रमांकांशी लिंक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे व ती कोणत्या गावात आहे, याबाबत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षापासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आधार क्रमांक तसेच संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आधारची पडताळणी केली जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने एका गावातील शेतीमध्ये कापूस व सोयाबीन लागवड केलेली आहे. ही शेतजमीन आधारशी लिंक असेल, तर तोच आधार क्रमांक दुसऱ्या गांवातील शेतीला जोडल्यास या दोन्ही क्षेत्रांची नोंद होणार आहे. त्यामुळे या योजनेतील लाभाच्या निकषानुसार दोन्ही क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे यातून शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टरसाठीच मदत मिळणार आहे. त्यामुळे एकाच योजनेच्या माध्यमातून जे काही दोनदा किंवा अनेकदा लाभ घेण्याच्या प्रकाराला या माध्यमातून आळा बसणार आहे. आधार क्रमांकाशी जोडलेली शेतीची माहिती आता ‘नमो किसान सन्मान योजने’ च्या ई-केवायसीला लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मदत मिळत असेल, तर ती आता नाकारली जाणार आहे. तसेच जे शेतकरी ‘नमो किसान सन्मान योजने ‘पासून वंचित आहे. त्यांना या प्रणालीमुळे लाभ मिळणार आहे. आधार क्रमांकाला शेतजमिनी लिंक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा सरकारला उपलब्ध होणार आहे.