पुणे : ग्राहकांना अखंडीत व योग्य भाराने वीज पुरवठा होण्यासाठी रोहित्रे सुस्थितीत असणे गरजेचे आहे. रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण वाढले तर शेती व बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होतो आणि शेतकऱ्यांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना सिंचन मिळत नाही. यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार आहे. ग्राहकांना अखंडीत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी १५ वर्षांपेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेली विद्युत रोहित्रे बदलण्यास व त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
महावितरण कंपनी राज्यातील २.९७ कोटी ग्राहकांना वीज वितरण प्रणालीमार्फत वीजपुरवठा करते. त्यामध्ये ४५ लाख शेतीपंप ग्राहकांचा समावेश असून, दरवर्षी त्यात १ लाख शेतीपंप ग्राहकांची वाढ होत असते. वीज वितरण प्रणालीमध्ये उपकेंद्रे, विविध वाहिन्या आणि विद्युत रोहित्रे यांचा समावेश होतो. ग्राहकांना अखंडित, नियमित आणि दर्जेदार विद्युत पुरवठा करण्यासाठी वितरण प्रणाली सुस्थितीत व सक्षम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आणि त्याची निगा राखणे जरुरीचे असते. शासनाच्या विविध योजनांमध्ये विद्युत मागणीतील वाढीनुसार नवीन उपकेंद्रे, वाहिन्या व नवीन रोहित्रांचा वितरण प्रणालीमध्ये समावेश करण्यात येतो. यामध्ये विद्युत रोहित्रे व त्यावरील भार तसेच त्यांची भौतिक परिस्थिती यांचा महत्त्वाचा भाग आहे.
ग्राहकांना अखंडीत व योग्य भाराने वीज पुरवठा होण्यासाठी रोहित्रे सुस्थितीत असणे महत्वाचे आहे. रोहित्रे वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण वाढले तर शेती व बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होतो आणि शेतकऱ्यांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना सिंचन मिळत नाही. या सर्व विषयांचा सारासार विचार करुन विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा आणि रोहित्रे जळण्याचे प्रमाण कमी व्हावे या हेतुने उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्र्यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नादुरुस्त विद्युत रोहित्र तत्काळ बदलण्यासाठी योजना जाहिर केली आहे. त्या अनुषंगाने “निरंतर वीज योजने’स मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
काय आहे शासन निर्णय?
– विद्युत रोहित्रे नादुरुस्त असल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पाणी असूनही योग्य वेळेत पिकांना संरक्षित सिंचन मिळत नाही. परिणामी उत्पन्नात घट होते. यासाठी नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर्स तत्काळ बदलण्यासाठी “निरंतर वीज योजना” सुरु करण्यास महावितरण कंपनीने सादर केलेल्या वर्षनिहाय नियोजनानुसार सरकारमान्यता देण्यात येत आहे.
– ग्राहकांना अखंडीत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी १५ वर्षांपेक्षा जास्त जुने व तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले विद्युत रोहित्रे बदलण्यास व त्यासाठी लागणारा खर्च १,१६० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. सन २०२३-२४ मध्ये २०० कोटी, २०२४-२५ मध्ये ४८० कोटी आणि २०२५-२६ मध्ये ४८० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.