पुणे : मोक्का कायद्यांतर्गत विशेष सत्र न्यायालयाने आज १३ सप्टेंबर रोजी बहुचर्चित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सशस्त्र दरोडा प्रकरणातील आरोपी सचिन इथापे, रामदास ढगे, पृथ्वीराज माने, मारूती सरडे यांना भारतीय दंड विधान व मोक्का कायद्यांतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० लाख रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी सतिश इथापे, मंगल इथापे, प्रियंका लोकरे यांना भा.द.वि.क ४१२, ४१३, ४१४ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलमांप्रमाणे ७ वर्ष सक्त मजुरी व दहा लाख रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.
दौंड तालुक्यातील राहु या गावामध्ये १० सप्टेंबर २०१६ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकवर सशस्त्र दरोडा टाकला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव व त्यांचे तत्कालीन सहकारी अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच यवत पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस हवालदार महेश बनकर, तसेच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यांनी समांतरपणे करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गोपनीय बातमीदारांमार्फत व तांत्रिक विश्लेषणच्या आधारे तपास केला.
या तपासात सचिन आप्पा ऊर्फ आप्पासाहेब ऊर्फ भाऊसाहेब इथापे, (बनावट नाव ) शिवाजी आप्पा पाटील (वय २८ वर्षे, रा. सध्या रा. प्लॉट नं ३५ माधवनगर, धुळे रोड चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव, मुळ रा. कोंडेगव्हाण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), रामदास ऊर्फ पप्पु ऊर्फ झिंग्या ऊर्फ समीर यशवंत ढगे (वय २७ वर्षे रा. चांबुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पृथ्वीराज ऊर्फ पतंग दत्तात्रय माने (वय २७ वर्षे, रा. मानेवस्ती, कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापुर), मारूती उर्फ पिंट्या शिवाजी सरडे (वय-२३ वर्षे, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर),
सतिश आप्पा इथापे उर्फ सतीश आप्पा पाटील (वय ३० वर्षे), मंगल आप्पा इथापे, (वय ४६), प्रियंका ज्ञानेश्वर उर्फ माउली लोकरे, उर्फ प्रियंका दिपक देशमुख (वय २४), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगन्नाथ लोकरे (बनावट नावः दिपक दादासो देशमुख) ( सर्व रा. माधवनगर, धुळे रोड चाळीसगाव, ता. चाळीसगाव जि. जळगाव), तुषार शिवाजी सरडे (रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर), बबलु ऊर्फ बिसेट साळवे (रा. विखेपाटील कॉलेज शेजारी एम. आय.डि.सी अहमदनगर) या दहा आरोपींना निष्पन्न केले होते.
तत्कालीन प्राथमिक तपास अधिकारी यांनी आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलमांप्रमाणे प्रस्ताव तत्कालीन पोलीस अधीक्षक यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पाठविला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलमांतर्गत प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे (सेवानिवृत), तत्कालीन सहा पो निरीक्षक विलास नाळे, पोलीस हवालदार महेश बनकर यांचे तपास पथकाने करून आरोपींविरूध्द विशेष न्यायालय मोक्का कायद्यांतर्गत शिवाजीनगर पुणे यांचे न्यायालयात सन २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
दरम्यान, आज १३ सप्टेंबर रोजी मोक्का कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने चार आरोपींना भारतीय दंड विधान व मोक्का कायद्यांतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० लाख रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. तर तीन आरोपींना भा.द.वि.क ४१२, ४१३, ४१४ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलमांप्रमाणे ७ वर्ष सक्त मजुरी व दहा लाख रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी, कोर्ट पैरवी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विधाधर निचीत यांनी पाहिले आहे.