पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पुणे पोलिसांवरच सराईत गुन्हेगारानी गोळीबार केला आहे. पुणे पोलिस आणि सराईत गुन्हेगार यांनी एकमेंकांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मुठा गावात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा थरार रंगला होता.
कुख्यात गुंड नव्या वाडकरच्या गोळीबाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोळीबारानेच उत्तर दिले आहे. अखेर पोलिसांनी आरोपी नव्या वाडकरला ताब्यात घेतलं असून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. नव्या वाडकर (वय-१८) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करत असतानाच वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एकही गोळी त्याला लागली नाही. त्यानंतर नव्या वाडकरने पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी पाठलाग करून नव्या वाडकरला अखेर बेड्या ठोकल्या.
नव्या वाडकरचे जनता वसाहत परिसरात वर्चस्व
पुणे शहरातील जनता वसाहत परिसरात २००७ मध्ये निलेश वाडकर आणि सनी चव्हाण उर्फ चॉकलेट सुन्या यांच्या गुन्हेगारी टोळ्या होत्या. या आधीपासूनच वाडकर हा सनी चव्हाणचा एकदम जवळचा मानला जायचा. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यात वाद होऊन खटके उडायला सुरुवात झाली. पुढे वाडकरने स्वतःची टोळी तयार केली.
दरम्यान, निलेश वाडकरचा खून करून सनी चव्हाण फरार झाला. त्यानंतर सनीला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून निलेश वाडकरचा मुलगा असलेल्या नव्या उर्फ नवनाथ वाडकर याने जनता वसाहत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. आज अखेर वाडकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.