संतोष पवार / पळसदेव (पुणे) : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांच्या दोनपैकी एक जागेवर कंत्राटी पद्धतीने डी. एड, बी. एड पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय २३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) घेतला आहे. मात्र, उमेदवार निवड प्रक्रियेचे निकष निश्चित करण्यात आले नव्हते. त्यासाठी विभागीय कार्यालयांकडून आयुक्तालयाकडे विचारणा करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर कंत्राटी नियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्तालयाने परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या कंत्राटी भरती निवड प्रक्रियेत स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अधिक गुण असलेल्या उमेदवाराचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार दहा आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यांपैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीने समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच संबंधित शाळेत दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा. उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील असावा.
स्थानिक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी. एड (पहिली ते पाचवीसाठी), बी. एड (सहावी ते आठवीसाठी) यात अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराची निवड करावी. समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक, व्यावसायिक पात्रताधारक उमेदवाराला प्राधान्य द्यावे. अधिकच्या पात्रता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे. रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज न आल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा. तसेच तालुक्यातूनही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले.