लोणी काळभोर: ‘पुरंदर तालुक्यातील काही शिक्षक शाळा सोडून गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याबरोबर फिरत असल्याचे दिसून आले आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी आहे. त्यामुळे ‘शिक्षक’ गैरहजर राहिले अथवा शाळा बुडवली, तर त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी दिला आहे. मात्र, पुरंदर तालुक्यापेक्षाही हवेली तालुक्याची परिस्थिती अधिक बिकट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हवेलीतील दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. दरवर्षी या ठिकाणी देशाच्या अनेक कोपऱ्यातून आणि परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक हे गैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे. तर काही शिक्षक हजेरी लावून त्वरित निघून जात आहेत. यामध्ये अनुभवी शिक्षक कारणे देण्यासाठी माहीर आहेत. त्यामध्ये काही शिक्षक पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेत शालेय कामकाजासाठी चाललो आहे, असे सांगून दांडी मारतात. तर काहीजण वरिष्ठांनी मिटिंगसाठी बोलावले असल्याचे कारण सांगतात. मात्र, शिक्षकांच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेकदा शाळा सोडून अधिकाऱ्यांच्या मर्जीत राहण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारतात. काही शिक्षक हे त्यांचे अध्यापनाचे काम सोडून गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांच्यासोबत फिरताना आढळून येतात. तर काही अधिकारीसुद्धा उपक्रमशील शिक्षकांना हाताशी धरून कामे करून घेतात. याचा गैरफायदा घेत काही शिक्षक शाळेवर थांबून विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी वरिष्ठांची मर्जी राखण्यात धन्यता मानतात. तर कधी कधी काही शिक्षकांची इच्छा नसली तरीही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी शाळा सोडून जावे लागते. या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची गुणवत्ता खालावली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
काही शिक्षक आठवड्यातील चार-चार दिवस शाळांमध्ये फिरकतसुद्धा नाही. त्यातील अनेक महाशय शाळेत येतात, परंतु वेगवेगळी करणे देऊन गायब होतात. तसेच गैरहजर राहणारे शिक्षक आपली हजेरी मात्र नित्यनेमाने लावतात. गैरहजर राहणारा शिक्षक एक रजेचा अर्ज ठेवून जातो. जर एखाद्या अधिकाऱ्याने भेट देऊन चौकशी केली, तर संबंधित शिक्षकाचा रजेचा अर्ज पुढे केला जातो. कोणी विचारपूस केली नाही, तर तो अर्ज फाडून त्या दिवसाची हजेरी मंडळी जाते. हे शिक्षक सरार्स शासनाची फसवणूक करत आहेत. पूर्व हवेली मधील कदमवाकवस्ती ग्रामाच्यात हद्दीतील एक तर आणि पेठ हद्दीतील एक शिक्षक मागील सहा महिन्यापासून वारंवार गैरहजर राहून वरील ट्रिक च्या माध्यमातून हजेरी लावत आहे
दरम्यान, जिल्ह्यातील काही शिक्षकांची शाळांमध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र, नियुक्ती झाल्यापासून संबंधित शिक्षक अद्यापही शाळेत हजर झालेले नाहीत. शिक्षक गैरहजर राहत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. हे निदर्शनास आल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी पुरंदर तालुक्यातील शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हवेली तालुक्यात विनाकारण शाळा बुडविणाऱ्या आणि शाळा सोडून इतरत्र फिरणाऱ्या शिक्षकांना चाप बसणार का? तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे हे गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा ”सवळा गोंधळ” उद्याच्या पुणे प्राईम न्यूजच्या अंकात नक्की वाचा…