हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला तसेच गर्दीच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, सोबतच वाहन चालकांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.
वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत महत्वासह व आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग, पीएमपीएमएल व एसटी बस थांबा पुढे घेण्यात आला आहे.
एसटी. पीएमपीएमएल बस थांबा नवीन ठिकाणी करण्यात आला आहे. १०० मीटर नो पार्किंग, ५० मीटर नो पार्किंगचे, नो एंट्री ,वन-वे ट्राफीकचा सूचना फलक लावण्यात आला आहे. मुख्य रहदारीच्या रोडवर वाहनाचे पार्किंग करू नये, अपघात व गाडीचे नुकसान होवू नये यासाठी नो पार्किंगचे सूचना फलक वाहतूक शाखेकडून लावण्यात आलेले आहे.
उरुळी कांचनसह परिसरात होत असलेले अपघात व वाहतुकीचा खोळंबा यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने सदर सूचना फलक लावले आहेत. यानंतर सुद्धा महत्वाच्या चौकात सूचना फलक लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी सदर फलकवरील सूचनांचे पालन करने गरजेचे आहे, असे आवाहन वाहतूक शाखने केले आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पुणे -सोलापूर महामार्गावर विशेषतः एलाईट चौक व तळवाडी चौक या परिसरात मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढता पादचाऱ्यांसह वाहनचालकांना कसरत करावी लागते.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज” ने वेळोवेळी बातम्यांद्वारेही पाठपुरावा केला होता. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सर्वेक्षण करून दोन्ही बाजूने पार्किंग फलक लावण्यास सुरुवात केलेली आहे.
दरम्यान, पुणे – सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानात खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच रविवारी हा बाजाराचा रस्ता असल्याने तसेच दुचाकी, चारचाकी वाहने कुठेही अस्ताव्यस्त लावलेली असतात.
त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना येथून जाताना कसरत करावी लागते. तसेच हॉटेल, व्यवसायिक गोडावून असल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल म्हणाले , वाहने चुकीच्या पद्धतीने उभी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असून सोलापूर, हैद्राबादकडे जाणारा एकमेव मोठा रस्ता आहे.लोणी काळभोर येथील मालधक्का येथून स्टील उद्योगास लागणारे साहित्य, स्टील रोल, पत्रे या साहित्याची वाहतूक जड वाहने व मोठे कंटेनर याद्वारे होत असते. गावातली मूळ रस्ते छोटे असल्याने तसेच स्थानिक नागरिकांची वाहने पार्क होत असल्याने वाहतूक कोंडी होत असते.त्यासाठी उपाययोजना म्हणून वाहतूक शाखेमार्फत विविध प्रकारचे बोर्ड लावण्यात आले आहेत. बस चालक हे आपल्या बस चौकाजवळच थांबवत असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती. त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी सदर ठिकाणी कार्यरत असणार आहेत.