पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान चर्चेत आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले, असे वक्तव्य त्यांनी केले होते. योगी आदित्यनाथ यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खरा इतिहास काय आहे, तो जगाला माहिती आहे. आमच्या दृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या, असे परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले. रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांना योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजामात यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण जिजाबाईंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचे स्वत:चे कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, आता काही लोक येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन करतील. या आवाहनाला भुलू नका, असे वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये केले होते. याविषयी विचारणा केली असता शरद पवार प्रथम हसले. यानंतर त्यांनी म्हटले की, चांगली गोष्ट आहे. पण मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही. वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली, हे बारामतीकरांनी पाहिले आहे. ते योग्य निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.