पुणे : अनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक केल्याच्या घटना आपल्याला ऐकण्यात येतात, मात्र एक-दोन नव्हे, तर तब्बल २५ महिलांची फसवणूक करणाऱ्या एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून पुण्याच्या एका जणाला अटक केली आहे. फिरोज निजाम शेख असे ३२ वर्षीय आरोपीचे नाव आहे.
एका महिलेने राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्कार दिली होती. त्यानुसार, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं तपास केला. त्यांना या प्रकरणाची पायामुळे पुण्यात सापडली. आरोपीला पुण्यात रविवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज निजाम शेख हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे वास्तव्यास आहे. तो मूळचा गंगावळण, इंदापूर येथील आहे. इंदापूरमध्येही फिरोज याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून फिरोजने लग्नाचे आमिष दाखवत २५ महिलांना फसवले आहे. त्यांच्याकडून पैसे उकळल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच त्याने महिलांसोबत शारीरिक संबंधही ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून फिरोज याची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत फिरोज शेख याने काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळल्याचेही समोर आलेय.
कोल्हापूर येथील एका घटस्फोटित महिलेला फिरोज शेख याने आपल्या जाळ्यात अडकवले. शादी डॉट कॉमवरून त्याला मोबाइल क्रमांक त्याने मोबाईल नंबर मिळवला. दोघांचे बोलणे वाढले आणि त्याने लग्न करण्याची आमिष दाखवले. इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे त्याने त्या महिलेच्या कुटुंबियांना सांगितले. ओळख वाढल्यानंतर शरीरसंबंध ठेवण्यासही भाग पाडण्यात आले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिनेही घेतले.
ब्रेन ट्यूमरचे कारण देत त्याने..
लग्नाचा विषय निघाल्यानंतर मात्र त्याने ब्रेन ट्यूमरचे कारण सांगत टाळा टाळ करायला सुरवात केली. त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने राजवाडा पोलीस फिर्याद दिली. कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली, त्या आरोपीचे लोकेशन पुण्यात असल्याचे कळाले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला पुण्यातील कोंडवा येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी फिरोज निजाम शेख, (मुळ पत्ता गंगावळण, कळाशी, ता. इंदापुर, पुणे सध्या राहणार फलॅट क्र ६०२, बी विंग, आयडियल होम अपार्टमेंट, उस्मानिया मजीद जवळ, मिठानगर, कोंढवा), याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुले आहेत. नमुद आरोपीविरुदध अशाच प्रकारचे यापुर्वी इंदापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेचे समजते. तसेच आरोपी याने यापुर्वी Shadi.Com च्या माध्यमातुन ओळख करुन २५ पेक्षा जास्त महिलांची फसवणुक केल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.