मंचर: आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावातील केंद्र व राज्य शासनाची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहे. मात्र अवसरी बुद्रुक येथील जलजीवन मिशन योजनेसाठी दोन वर्षांपूर्वी २१ कोटी रुपयांची योजना मंजूर झाली. मात्र या योजनेचे काम अद्यापही चालू न झाल्याने ही योजना फक्त कागदोपत्री मंजूर झाली आहे का ? असा संवाल अवसरीकर ग्रामस्थ करू लागले आहेत.
ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिकांना नळ पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध व नळाद्वारे घरोघरी पाणी मिळावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावासाठी निधी मंजूर केला असून अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची कामे पूर्ण झाली आहे. तर काही गावांमध्ये कामे सुरू आहेत. मात्र आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावामध्ये अद्यापही या योजनेचे काम सुरू झाले नाही.
दोन वर्षांपूर्वी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे ग्रामपंचायतीने जाहीर केले. मात्र दोन वर्ष होऊन सुद्धा अद्याप नळ पाणीपुरवठा योजनेचे काम चालू झाले नाही. याबाबत गावचे सरपंच, उपसरपंच पाठपुरावा करत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अद्यापही ही योजना चालू झाली नसल्याने ती फक्त कागदोपत्री मंजूर झाली आहे का? ही योजना होणार आहे की नाही? नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणार आहे की नाही? असे अनेक प्रश्न गावातील नागरिकांना पडले आहेत.
मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार…
अवसरी बुद्रुक गावासाठी ग्रामपंचायतच्या वतीने योग्य नियोजन करून विविध तीन विहिरी व बारववरून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सरपंच सारिका हिंगे व उपसरपंच अनिल हिंगे पाटील हे करत आहेत. तसेच गावाला नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे. पुढील काळात गावाला बाराही महिने दररोज एक तास पाणीपुरवठा चालू ठेवण्यासाठी स्मशानभूमी जवळील ओढ्यावर सिमेंट बंधारे व विहीरसाठी निधी मंजूर करण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर यांनी सांगीतले.