लोणी काळभोर: पुरोगामी राज्य म्हणून देशभर बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्राच्या ‘सांस्कृतिक राजधानी’त मात्र महिला पोलीस अधिकाऱ्यांची चणचण भासत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील महिला, विद्यार्थिनींवरील छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अत्याचार व छेडछाडीचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकही महिला अधिकारी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला-युवतींची कुचंबणा होते.
लोणी काळभोर, उरुळी कांचन ही शहरे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. शैक्षणिक, अभियांत्रिकी, वैद्यकीयसह स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे या ठिकाणी लाखो विद्यार्थी व कामगार येतात. कायदा सुव्यवस्था राखताना पोलीसांना ताण सहन करावा लागत होता. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज होती. त्यामुळे पुणे शहर दलातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाणे २० जानेवारी २०२४ रोजी निर्माण करण्यात आले आणि उरुळी कांचन पोलीस ठाणे हे जिल्हा ग्रामीण दलात समाविष्ट झाले.
लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांची छेडछाड व अत्याचाराच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच महिलांची तक्रार ऐकून घेण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना महिला पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत असली तरी वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मार्च २०२४ या महिन्यात तीन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचीही १५ दिवसाच्या आत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकही महिला अधिकारी उपलब्ध नाही. महिलांना प्राधान्य देत त्यांच्या तक्रारी देखील महिला पोलिसांनीच घ्याव्यात, असे नियम गृहखात्याने तयार केले आहेत. मात्र, महिला पोलिस अधिकारीच नसल्याने त्या सर्व तक्रारी व तपास करण्याची वेळ पुरुष पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.
महिलांची माहिती सांगताना होतेय कुचंबना
महिलांची सुरक्षा हे आजही भारतातील सर्वात मोठे आव्हान आहे. महिलांवरील हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत. खून, हुंडाबळी, मारहाण, ऑनर किलिंग, स्त्री भ्रूणहत्या, लैंगिक गुन्हे, बलात्कार, विनयशीलतेशी संबंधित हिंसा, मानवी तस्करी, जबरदस्ती वेश्याव्यवसाय, पोक्सो, घरगुती हिंसा, बालविवाह, अपहरण, ॲसिड फेकणे असे अनेक गुन्हे दररोज घडत असतात. यामधील सर्व पीडित महिला त्यांच्या समस्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना बिनधास्तपणे सांगू शकतात. मात्र, जर पुरुष पोलीस अधिकारी असेल तर महिलेची माहिती सांगताना कुचंबना होते.
महिला पोलीस अधिकाऱ्यांची गरज
पोलीस ठाण्यात महिला अधिकारी असल्यास, महिला तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे जाण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ती तिच्या समस्यांबद्दल उघडपणे बोलू शकते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर एक स्त्री तिच्या सर्व समस्या उघड करू शकत नाही. महिला पोलिस अधिकारी विनयभंग आणि बलात्काराची प्रकरणे अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.
महिलांच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची अत्यंत गरज असते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यासाठी महिला अधिकारी मिळाव्यात, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. लवकरच महिला अधिकारी दिले जातील, असे वरिष्ठांनी सांगितले आहे.
– शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाणे होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या पोलीस ठाण्याला महिला कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र एकही महिला अधिकारी पोलीस उपलब्ध नसल्याची बाब खरी आहे. महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करणे माझ्या हातात नसून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात आहे.
– शंकर पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन पोलीस ठाणे)