पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होईपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांसाठी ग्रामीण भागात उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून दोनवेळा चार आणि तीन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे.
पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांमध्ये सध्या १६.१० टीएमसी (५५.२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करताना आणि पावसाळ्यापर्यंत धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी पार पडली.
मात्र, लोकसभा निवडणूक लक्षात घेता पुणे शहरात पाणीकपात केले तर पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तूर्त पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, लोकसभेचं मतदान झाल्यानंतर पाणीकपात करावी लागणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरात पाणीकपात होणार नसून, १५ जुलैपर्यंतच्या पिण्याचे पाणी खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात येणार आहे. उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी सिंचनाचे एकच आवर्तन देण्यात येणार असून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. खडकवासला प्रकल्पातील ४ धरणांमध्ये सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ अब्ज घनफूट (टीएमसी) कमी पाणीसाठा आहे.
प्रकल्पात आज १६.१४ टीएमसी (५५.३५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी २३ फेब्रुवारीला तो १९.१३ टीएमसी (६५.६० टक्के) होता. त्यामुळे पाण्याचा वापर सर्वांनीच जपून करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.