वार्ताहार : विजय लोखंडे
वाघोली : वाघोलीत रात्रीच्यावेळी ट्रॅव्हल्स बस प्रवाशांच्या पिकअप ड्रॉप करीता महामार्गाच्या कडेलाच थांबत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाघेश्वर चौक, केसनंद फाटा ते बकोरी फाटापर्यंत ट्रॅव्हल्स बसेस करीता नो हॉल्टींग, नो पार्किंग करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल्स बसेस यांना बकोरी फाट्याचे पुढे थांबा देण्यात येत असल्याचे आदेश पुणे पोलीस वाहतूक शाखेचे रोहिदास पवार यांनी काढले आहेत. याबाबत नागरिकांच्या हरकती व सुचना असल्यास येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात 18 जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
केसनंद फाटा येथे नगर बाजुकडे जाणारा रस्ता हा अरुंद आहे. याठिकाणी भारत पेट्रोल पंपासमोर पुण्यातून नगर, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणारे प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असतात. ट्रॅव्हल्स या केसनंद फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर पिकअप, ड्रॉप करीत असल्याने दररोज रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊन त्याचा सामान्य नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी वाघेश्वर चौक, केसनंद फाटा ते बकोरी फाटापर्यंत ट्रॅव्हल्स बसेस करीता नो हॉल्टींग, नो पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरता आदेश काढले आहेत.
ट्रॅव्हल्स बसेस यांना बकोरी फाट्याचे पुढे थांबा देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. नागरीकांच्या सूचना व हरकती विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने (फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. वाघोलीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यावेळी लोणीकंद वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक गजानन जाधव म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे वाहतूक समस्या वाढली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वाहतूक शाखेने सा.बां. विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर केसनंद रस्त्याची दुरुस्ती तसेच नगर महामार्ग व वाघोली-केसनंद रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो.