पुणे : राज्यात सद्या गणेशोत्सवाचा आनंद सगळीकडे दिसून येत आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत ही देशात प्रसिद्ध आहे. अशातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये 30 पेक्षा जास्त वादक नसावेत, असा आदेश हरित लवादाने दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हा आदेश रद्द केला आहे.
अधिक माहिती अशी की, हरित लवादाने 30 ऑगस्ट रोजी वादकांच्या संख्येसंदर्भात आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी याबाबत स्थगितीचे आदेश दिले आहेत. वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.
पुण्यातील गणेशमूर्ती विसर्जनावेळी ढोल-ताशा-झांज मंडळाच्या सदस्यांची संख्या ही ३० जणांपर्यंत मर्यादित असावी, असा आदेश हरित लवादने दिला होता. कोर्टाने राज्य सरकार, पुणे प्राधिकरण आणि इतरांना नोटीस बजावली होती. त्यांना त्यांचे ढोल, ताशा वाजवू द्या.. कारण ढोल-ताशा हे पुण्याच्या हृदयात आहे, अशा शब्दात कोर्टाने ढोल-ताशांचं समर्थन केलं आहे.
गणेश उत्सव सुरू असताना सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ढोल-ताशांच्या पथकासाठी मोठा दिलासा देणारा आहे. पुण्यामध्ये अनेक मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढली जात असते. या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशांच्या पथकांचा समावेश असतो.