Pune : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फारसे यश मिळाले नाही. महायुतीमधील सर्वच पक्षांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळव्हता आला. भाजपाच्याही जागा कमी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार निवडून आला असला तरी त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद हवे होते. परंतु भाजप श्रेष्ठींकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिले जात होते. परंतु त्यावर नाराजी व्यक्त करत अजित पवार गट आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने राज्यात ८० जागांची मागणी केली आहे. शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात चार जागा
जळगाव जिल्ह्यातील ४ जागा, धुळे २, नंदुरबार २ यानुसार उत्तर महाराष्ट्रात आठ जागांची अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत राज्यातील विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गट ८० जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असे अनिल पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय भूमिका असेल? या प्रश्नावर उत्तर देताना अनिल पाटील म्हणाले, की महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष आहेत ते ठरले आहेत. त्यानुसार छगन भुजबळांनी ९० जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली होती. तरी किमान ८० जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.