पुणे : बारामतीतील रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी (ता. २) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नसल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पण मला बोलवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करायला मी नक्की जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या परिसरातील मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी ही नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी संपष्ट केले.
विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत आतापर्यंत अनेक दिग्गज येऊन गेले. शरद पवारांच्या आमंत्रणानेच हे लोक इथे आले. त्यामुळे बोलवले तर मी देखील नक्की जाईन’, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
‘या रोजगार मेळाव्याचे आमंत्रण मला अजून आले नाही. मात्र, मला बोलावल्यास, या परिसरातील मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांचे स्वागत करावे. मला अतिथि देवो भवं, हे आधीपासून शिकवले गेले आहे.
पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथे २ व ३ मार्च रोजी आयोजित विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १) मार्च रोजी नोकरीविषयक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स), मुलाखत तंत्र या विषयांवर मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम १ मार्च रोजी बारामती शहरातील शारदानगर येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या आप्पासाहेब पवार सभागृहात सकाळी १० ते १२, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे सभागृह व विद्याप्रतिष्ठानचे गदिमा सभागृह, विद्यानगरी येथे सकाळी १० ते २ व श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सभागृहात दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
रोजगार मिळविण्यासाठी मुलाखतीला जाताना युवक-युवतींना प्रशिक्षणाचा लाभ होणार असून रोजगार इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.