योगेश शेंडगे
शिक्रापूर: ढगाळ हवामान आणि हवेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आर्द्रता यामुळे निर्माण झालेल्या असह्य उकाड्याने शिरूर तालुक्यातील पारोडी व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच सलग दोन दिवस वीज गायब असल्याने नागरिकांचे होणारे हाल याला पारावार राहिला नाही. तब्बल दोन ते अडीच महिने उन्हाळ्याचा कडाका सोसल्यानंतर गेल्या आठ दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला होता. परंतु, नागरिकांचा हा सुखद अनुभव, मात्र फार काळ टिकला नाही.
दरम्यान, बुधवार २२ मे रोजी तालुक्यात दिवसभर ढगाळ आणि पावसाळी वातावरण होते. मोठा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील उष्णता बाहेर पडल्याने उकाड्यात भर पडली. वारा पूर्णपणे थांबला होता. झाडाचे पानही हलत नव्हते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत वाढले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या उकाड्याने तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते.
त्यातच ३३/११ के.व्ही.च्या टाकळी भीमा येथील सबस्टेशनमध्ये अडचण असल्यामुळे पारोडी व पंचक्रोशी भागात होणारा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तब्बल ४८ तास वीज नसल्याने आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे उष्णतेने खूप हाल झाले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज पूर्णपणे चुकला. वारे बंद असल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागला.
नदी उशाला…. अन् कोरड घशाला
भीमा नदी काठी असलेल्या गावात वीज पुरवठा खंडित असल्यामुळे जनावरांना पाणी, नागरिकांना पिण्याचे पाणी याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पारोडी व पंचक्रोशीत दिसून येत आहे.
वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार
वीज वितरण कंपनीने विद्युत सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे, असे सांगितले होते. गुरुवार 23 मे रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नाही. वीज पुरवठा नेमका कधी सुरळीत होणार? याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे नेमकी माहिती नाही, असे नागरिकांमध्ये चर्चा आहे.