दौंड: तालुक्यातील बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव १४ विरुद्ध १ मतांनी मंजूर झाला झाला आहे. सोडनवर यांच्या विरोधात २२ मे रोजी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे या कारणांवरून दौंड तालुक्याचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे अविश्वास ठरावासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी आज (दि. २९) शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. यासाठी बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या १७ सदस्यांपैकी १५ सदस्य उपस्थित होते, तर २ सदस्य गैरहजर राहिले.
बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या १७ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी विद्यमान सरपंच सुनील सोडनवर यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी दौंड तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार शेलार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता.२९) विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मतदानात एकूण १५ सदस्य उपस्थित होते. यापैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर सरपंच सुनिल सोडनवर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.
सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, मनमानी कारभार करणे, परस्पर निर्णय घेणे आदी कारणांसाठी अविश्वास ठराव आणण्यात आला होता. यावेळी बाळू सोडनवर, सोमनाथ गडदे, मनीषा कोळपे, जयश्री उदागे, सरला शर्मा, अनिल नेवसे, मनीषा बर्वे, शेखर सोडनवर, संगीता ताडगे, अशोक अडसूळ, रोहिणी नेवसे, सपना कोळपे, आम्रपाली गायकवाड, राजेंद्र भोसले आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच सुनिल सोडनवर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आता पुढील सरपंच कोण होणार? याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत.