अमित मुंडीक

पुणे: पुण्यातील धकाधकीच्या परिसरातून (Nitin Gilbile Murder) समोर आलेल्या एका धक्कादायक (Pune Crime) घटनेत मित्रानेच मित्राची निर्दयीपणे हत्या केल्याचा थरारक प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघड झाला. व्यापारी नितीन गिलबिले यांची फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसलेल्या अवस्थेत डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी नितीन यांना गाडीतून रस्त्यावर फेकून दिले आणि त्याच गाडीखाली त्यांना चिरडून पसार झाले. संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती.

घटनेनंतर गुन्हेगार फरार झाले होते; मात्र तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. डीसीपी मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार अमित पठारे, विक्रांत ठाकुर, सुमित पटेल आणि आकाश पठारे या आरोपींना पुणे जिल्ह्यातील विविध भागातून अटक करण्यात आली आहे.

चौकशीत आरोपींनी कबूल केले की जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून नितीन यांच्याशी त्यांची अनबन झाली होती. रागाच्या भरात त्यांनी ही हत्या करण्याचे ठरवले. पोलिसांनी आरोपींना अटक करताच गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्यूनर गाडीही जप्त केली आहे. या निर्दयी हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या वेगवान कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.







