दीपक खिलारे
इंदापूर : केंद्र सरकारला साखर कारखान्यांकडून देय असलेल्या आयकराच्या (इन्कम टॅक्स) दहा हजार कोटी रक्कमेला अर्थसंकल्पामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने साखर कारखानदारीला आयकरातून कायमचे मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव शहाजीनगर (ता. इंदापूर) निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याने केला आहे.
आयकर विभागाच्या नोटिसांमुळे साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला होता. प्रदीर्घ काळ हा प्रश्न प्रलंबित होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी साखर उद्योगावरील आयकर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक व साखर कारखानदारीला दूरगामी फायदा देणारा असल्याचे याप्रसंगी बोलताना कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
देशातील साखर उद्योगाला आयकरातून मुक्त करून केंद्र सरकारने साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारा ठराव कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी मांडला व त्यास उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील तसेच संचालक विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रताप पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.