पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी गुरुवारी आपली राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयात पोहोचले. सुरुवातीला ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे सांगितले जात होते. त्याचवेळी या कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके हेदेखील उपस्थित होते. बुधवारपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते. यादरम्यन निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी काहीवेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.
तसेच आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणखी काही वेळ घेऊ, असे वसंत मोरे यांनी म्हटले. त्यामुळे ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वसंत मोरे यांना पुण्यामधून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. पण महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे आता वसंत मोरे हे शरद पवार यांच्याशी चर्चा करुन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.