निगडी : निगडी प्राधिकरण येथे आज अक्षता वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा नियोजनबद्ध शुभारंभ झाला. सैनिक संघ पुणे जिल्हा मुख्य सरचिटणीस दत्तात्रय कुलकर्णी यांनी या सोहळ्या प्रसंगी गौरवोद्गार काढले. “संस्कृती रक्षण करणारा प्रत्येक भारतीय हा सैनिकच आहे”, असे ते म्हणाले. पेठ क्रमांक २४, काचघर चौक, निगडी प्राधिकरण येथे हा कार्यक्रम आज शुक्रवारी, दिनांक ०५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला होता.
प्रभू श्रीराम प्रतिमापूजन आणि मंदिर रथावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा शुक्रवार, दिनांक ०५ जानेवारी ते मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे.
यावेळी मुख्य संयोजक, प्राधिकरणातील वस्ती प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, शिवसेना शहर संघटिका सरिता साने, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रतिनिधी प्रशांत मोरे, मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दत्तात्रय कुलकर्णी पुढे म्हणाले की, “प्रत्येक देशाचा दर्जा त्या देशात नांदणारी संस्कृती, विज्ञान आणि कला यांवरून ठरत असतो. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्य गुण असतात. मंगल अक्षता वाटप करणारे हात पवित्र आहेत. मंगल श्रीराम अक्षता वाटप सोहळा हा भारतीयांच्या परम श्रद्धेचा सोहळा आहे!”. चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी उपस्थितांना अक्षता वाटप अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली.
या सोहळ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा आणि रोषणाईने उजळून निघालेला मंदिर रथ, होता. स्त्री आणि पुरुष यांना कुंकुमतिलक या माध्यमातून आमंत्रण, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच पुरुषांकडून भगवे उपरणे आणि टोपीचा आवर्जून वापर केला होता. शंखनाद, श्रीरामनामाचा जयघोष, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळे, मंदिर विश्वस्त यांचा सहभाग इत्यादी गोष्टींचा समावेश होता. श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट आणि भूतपूर्व सैनिक संघ पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२