पुणे : राज्यातील पावसाचं सावट दूर होताच किमान तापमानाचा पारा घसरत आहे. यामुळे राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आले असून तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. येथील काही भागाचे तापमान उणे ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे
महाराष्ट्रावर या आठवड्यात मध्यम दावाचा पट्टा राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहून आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे हवामान कोरडे राहील. मात्र, थंडीची लाट नसेल.
राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता आहे. १५ ते २० जानेवारीदरम्यान राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. रविवारी १४ जानेवारीला राज्यात सर्वात कमाल तापमान सोलापूर येथे ३४.८ अंश सेल्सिअस इतके, तर सर्वांत कमी किमान तापमान वाशिम येथे १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले
पुढील ४८ तासात तापमानात घट होणार
मध्य आणि पूर्व भारतात पुढील ४८ तासात तापमानात घट होणार आहे. पुढील २ दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. राजस्थान, दिल्लीमध्ये थंडीची स्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. १६ जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
२४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान
१४ जानेवारीला पुण्यात १५.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होते. तर, अहमदनगर १५.२, जळगाव १६.७, कोल्हापूर १८.५, महाबळेश्वर १५.५, मालेगाव १९, नाशिक १५.४, सांगली १७.२, सातारा १५.८, सोलापूर येथे १८.६, मुंबई २२.६, सांताक्रूझ २०.६, रत्नागिरी २१.१, डहाणू १८.६, धाराशीव १८, छत्रपती संभाजीनगर १६.४, परभणी १७, नांदेड १७.८, अकोला १६.७, अमरावती १६.४, बुलढाणा १७, ब्रह्मपुरी १७.६, चंद्रपूर १६, गोंदिया १६. नागपूर १६.२, ६.२. वाशीम १४.६, तर यवत यवतमाळ येथे १५.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले आहे.