लोकशाही बळकटीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी : मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे
लहू चव्हाण
पाचगणी : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी नवमतदार युवकांनी मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आव्हान तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या आदेशान्वये मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे यांनी केले.
मतदारांचे नाव चुकीचे असेल व पत्ता चुकीचा असेल त्यांनीही नाव दुरुस्त करून घ्यावे. पाचगणी व परिसरातील १८ वर्षांपुढील युवकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, यासाठी नवीन मतदार नावनोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे. १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारयादीमध्ये नावे नोंदवावीत, असे आवाहन चंद्रकांत पारवे यांनी केले आहे.
या वेळी बोलताना पारवे पुढे म्हणाले की, मतदार नावनोंदणीसाठी जन्म पुरावा, शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड, रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे लागतात. मतदारांनी कागदपत्रांसह उपस्थित राहून, नाव नोंदवून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.