पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरूनगर, आळंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. त्याचा विचार करून या भागात स्वतंत्र महापालिका करण्याच्या हालाचाली सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही या संदर्भात या तीन नगरपरिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी, असा स्पष्ट अभिप्राय राज्य शासनाला पाठविला आहे. पुणे महापालिकेची हद्दवाढ २०२१ मध्ये झाली, तर पिपरी चिंचवड महापालिकेमध्ये आणखी काही गावांच्या समावेशाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पिपरी-चिंचवड शहरालगत चाकण, राजगुरुनगर, आळंदी परिसरात औद्योगिक पट्टा विकसित झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद, तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबत मागणी सातत्याने होत आहे.
चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगरपरिषद्, तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. स्वतंत्र महापालिकेच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू आहेत. त्यामुळे राज्य शासनाने चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद, तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशील, तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा प्रशासन व महापालिकेकडून अभिप्रायासह अहवाल मागविला होता. पिंपरी -चिंचवड महापालिकेने स्थापन करण्यास हरकत नसल्याचा स्पष्ट अभिप्रायासह अहवाल पाठविला आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही अभिप्राय पाठविला आहे. त्यामुळे चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगरपरिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापनेचा निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पिंपरी महापालिकेने अभिप्रायात काय म्हटले?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे, या भागातील गावे महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे चाकण, राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नाही, असा अभिप्राय पिंपरी चिंचवड महापालिकेने दिला आहे.