लोणी काळभोर : खडकवासला धरणातून १००५ क्युसेस पाणीसाठा नवीन मुळामुठा कालव्यात सोडण्यात आला असून त्यामुळे नवीन कालव्यामध्ये पाणीसाठा जास्त प्रमाणात आल्याने फुरसूंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील देशमुखमळा परिसरात रस्त्याखालून जाणाऱ्या कॅनोलला मोठी घळ अर्थात बोगदा पडून कालवा आज सोमवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास फुटला होता.
कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगवधान दाखवून दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टरच्या माध्यमातून या नवीन मुळामुठा कालव्यातून वाहून चाललेल्या पाणीसाठा तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे.
कालवा बंद करण्यासाठी शेतकरी बाळासाहेब देशमुख, महेश चोरघडे, विशाल हरपळे, विलास कामठे, महेश चोरघडे, काका खराडे, नाना चोरघडे, प्रकाश देशमुख, गणेश ढोरे, नवल देशमुख, प्रदीप पवार, सोमनाथ पवार, नितीन हरपळे, मच्छिंद्र पाटील, शिवराम चोरघडे ,रवींद्र कड, अमोल कामठे, जीवन पवार, जीवन कामठे, प्रीतम देशमुख, अनिकेत चंद, भाऊसाहेब हरपळे यांचे सहकार्य मिळाले. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी शिंदे व अभियंता जोशी मॅडम यांना कालवा बंद करण्यासाठी सांगितले.
उपअभियंता मुख्यालयातून सातत्याने ‘गायब’
खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण व पुण्यातील अत्यंत संवेदशील असलेला मुठा कालवा असताना देखील खडकवासला पाठबंधारे खात्याचे उपअभियंता मोहन भदाणे हे विनापरवानगी मुख्यालय सोडत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात व कालव्याचे महत्वाचे आवर्तन सुरू असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडणे अपेक्षित नाही. यासंदर्भात एका शेतकऱ्याने भ्रमणध्वनी द्वारे मोहन भदाणे संपर्क साधला असता, मी अजून नवीन असून मला जास्त माहिती नाही, मंगळवारी पुण्याला आल्यावर आपली भेट घेतो, असे सांगितले.
गायब अधिकारी, जलपर्णी आणि कालव्याची दुरुस्ती
अधिकारी गैरहजर राहत असल्याने शेतकरी व विविध वर्गातील कामे प्रलंबित राहत असून महत्वाच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. जलपर्णीमुळे कालवा फुटला तर जबाबदारी नक्की कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याने पाणी थांबवून फुटलेल्या कालव्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.
ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना
नवीन मुळा मुठा कालवा फुटल्याची माहिती मिळताच, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता जगताप, कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी भेट दिली. यावेळी पाटबंधारे खात्याचे भाऊसाहेब हरपळे व सुपे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी कालव्याची पाहणी करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत बोलताना खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले कि, नवीन मुळा मुठा कालवा हा १९६० साली बांधण्यात आला आहे. कालवा हा खूप जुना आहे.
त्यामुळे कालव्यातून जोपर्यंत पाणी बाहेर येत नाही. तोपर्यंत कालव्यातून पाण्याची गळती होती कि नाही ते समजत नाही. परंतु, संपूर्ण कालव्याची तपासणी करून गळती थांबविण्यासाठी कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.