पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील देशी, विदेशी दारू, बिअर, वाइन विक्रीचे नवे परवाने, परवाना दुरुस्ती, हस्तांतरण आणि नूतनीकरण प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तास अगोदरपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे म्हणून घोषित करत मद्या विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात बारामती मतदारसंघासाठी ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत, तर पुणे, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजे १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि ४ जून रोजी संपूर्ण दिवस मतदारसंघातील सर्व मद्यालये, मद्य विक्री दुकाने, ताडी केंद्र बंद असणार आहेत.
आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांततेत, निर्भय, निःपक्षपाती आणि भयमुक्त, शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मद्य विक्री परवाने, नवीन परवाने, नूतनीकरण आणि दुरुस्ती आदी प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
तसेच ड्राय डे पाळण्याच्या अनुषंगाने बारामती आणि इतर तीन मतदारसंघांच्या मतदानाच्या ४८ तास अगोदर देशी, विदेशी, ताडी केंद्र बंद ठेवण्यात येणार असून, वा वेळी वाहतूक परवाने देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ परवानाधारकांना मद्य निर्मिती करता येऊ शकणार असली, तरी विक्री, वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या नियमांचे पालन न केल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ आणि त्याअंतर्गत तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या आदेशात देण्यात आला आहे.