पुणे: पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणाच्या तपासाला चांगलाच वेग आला असून त्यामध्ये रोज नवनवी माहिती समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक खुलासेही होत आहेत. याप्रकरणात दहा आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.
आता या हत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. शुक्रवारी शरद मोहोळची पाच जानेवारीला हत्या झाली. मात्र, तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा तो प्रयत्न फसला. अखेर मोहळ याच्या लग्नाच्या वाढदिवशीच आरोपींनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असून या गुन्ह्यातील मास्टर माईंड कोण आहे? याचा शोधही पोलिस घेत आहेत.
महिन्याभरापूर्वीच शिजला हत्येचा कट
शरद मोहोळ याच्या हत्येने पुणे शहरात खळबळ माजली, या हत्याकांडाने अनेकांना धक्का बसला. पण मिळालेल्या माहितीनुसार, हे काहीही अचानक घडलेलं नाही. या खुनाचा कट जवळपास महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसं हा कट रचत होते. याबाबत शरद मोहोळला जराशीही कल्पना नव्हती. शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्याच जवळची म्हणजेच त्याच्यासोबत सावलीसारखी वावरत होती, हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले.
दरम्यान दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी हे आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून नेहमी घडत होती. त्याचाच राग आरोपींच्या मनात घर करून होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच हत्येचा हा कट रचला. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी घरात जेवल्यानंतर आरोपींनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.