संतोष पवार
पुणे : फुले पुणे विद्यापीठातर्फे पुढे ढकलण्यात आलेल्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या हॉल तिकीटाच्या आधारेच येत्या 31 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी प्रविष्ट व्हावे. विद्यार्थ्यांनी जुन्या हॉल तिकीटचा वापर करू नये, असे आवाहन विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
बदलापूर येथील शाळेत घडलेल्या निंदनीय घटनेच्या पार्श्वभूमीवर 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, विद्यापीठातर्फे 24 ऑगस्ट रोजी पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार होती. महाराष्ट्र बंदमुळे विद्यापीठाने पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा 31 ऑगस्ट रोजी ढकलण्याचा निर्णय घेतला. आता विद्यापीठाने 31 ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीचे नवे हॉल तिकीट विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी हे हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकतात.
नव्या हॉल तिकीट वर देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरच विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जाणे आवश्यक आहे. विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी येत्या 28 ऑगस्ट रोजी मॉक टेस्ट देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थी आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून मॉक टेस्ट देऊ शकतात, असेही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.