लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विद्यार्थिनी नेहा व्यंकटेश राठोड हिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिल्या जाणाऱ्या ‘द इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राईज’साठी नामांकन जाहीर झाले आहे.
‘किड्स राईट्स फाउंडेशन ऍमस्टडॅम’ या संस्थेद्वारे जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या शांतता पुरस्कारासाठी ‘द इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस’चे नामांकन जाहीर झाले आहे. बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या युनिसेफपासून नामांकित विविध संस्थांच्या माध्यमातून जगभरातून ३५ देशांमधील १२ ते १७ वयोगटातील एकूण १४० विद्यार्थ्यांना नामांकन मिळाले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा नं. २ लोणी काळभोरमधील विद्यार्थिनी नेहा राठोड हिचा समावेश आहे.
नामांकनाची माहिती वेबसाईटवर
आज ‘किड्स राईट्स फाउंडेशन’ या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या ‘द इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस’च्या घोषित केलेल्या नामांकनामध्ये तिची निवड झाल्याचे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी दिली होती परीक्षा
गेल्यावर्षी इयत्ता सातवीत असताना नेहाने परीक्षा दिली होती. आता ती आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. ‘द इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस’च्या घोषित केलेल्या नामांकनामध्ये तिची निवड झाली आहे.
वडील टेलर, कुटुंबात थोरली
नेहा हिचे वडील टेलर असून, त्यातूनच ते स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर तिची आई गृहिणी आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा असून, नेहा कुटुंबात थोरली आहे. त्यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील असले तरी ते कामानिमित्त सध्या लोणी काळभोर मध्ये वास्तव्यास आहेत.