पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी करण्यात आली. हे सरकार रोहित पवार यांच्या मागे जाणूनबुजून ईडी लावत असल्याचा आरोप करत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. यावेळी आंदोलक अधिक आक्रमक झाले होते.
या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले होते. आक्रमक आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका क्षुलक्षणा धर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. शहरात राष्ट्रवादीत दोन गट पडले असून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आणि महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा निषेध करण्यात आला. महापालिकेत १,२०० कोटींचा टीडीआर घोटाळा झाला. जिल्ह्यातील श्रीमंत महानगरपालिकेवर तब्बल ५०० कोटींचे कर्ज काढण्याची वेळ येत आहे. ६५ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याची वेळ का आली? असे अनेक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले.