पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कसबा येथील आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. मात्र, पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, असा म्हणताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. रुपाली पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे मात्र, पक्षातूनच नाराजीचा सूर निघत असल्याचे चित्र आहे.
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांची चारच दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्यानंतर पाचव्याच दिवशी राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी कसबा मतदार संघावर दावा ठोकताना या पोटनिवडणूक लढविण्याची तयारी दर्शवीली आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पाचव्याच दिवशी रुपाली पाटील यांनी कसबा मतदारसंघावर दावा दर्शविल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
माध्यमांशी बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मुक्ता टिळक यांच्यानंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणी नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाही.
मुलगा सुद्धा लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे, असे म्हटले आहे. मनसेने २०१९ मध्ये मुक्ता टिळक आजारी आहेत म्हणून माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही समजूतदारपणा दाखवला होता. पण त्यानंतर कुठलीही विकासाची कामे झालेली नाहीत. तसेच पोटनिवडणुकीत जनतेचा कौल मी स्वीकारेल, असे स्पष्टीकरण देखील पाटील यांनी दिले.
रूपाली पाटलांनी घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वरिष्ठांना न विचारताच पाटील यांनी भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी नाराज झाले असून याबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
पाटील यांच्या घोषणेमुळे जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचे राष्ट्रवादी पदाधिकारी यांचे मत आहे. मुळात राज्यात महाविकास आघाडी आहे. आणि कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असूनही रूपाली पाटलांनी दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.