पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला देण्यात आले आहे. त्यानंतर आता त्याचे पडसाद राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्येही उमटू लागले आहेत. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये सुद्धा वाद जाऊन पोहोचला आहे. बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढून टाकले आहे. यावेळी घड्याळ चिन्ह काढताना त्यांना अश्रु अनावर झाले. प्रशांत जगताप यांनी आपल्या गाडीवरील घड्याळ चिन्ह देखील कढून टाकले.
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कार्यालयावरील चिन्ह काढण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी हे नाव देखील काळ्या कापडाने झाकण्यात आले आहे. शरद पवारांकडून चिन्ह आणि नाव गेल्यानंतर पुण्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावूक झाले. चिन्हाची पाटी काढताना जगताप यांच्या डोळ्यात अश्रू आले.