यवत : दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा नेते दिग्विजय जेधे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने राजकोट किल्ल्यावरील झालेल्या घटनेचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाप्रकरणी कसून चौकशी केली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारल्याने कलाकार जयदीप आपटे याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, याबाबत पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळणे हा शिवरायांचा अवमान असून, या घटनेमुळे राज्याचा स्वाभिमान कोसळल्याची खंत व्यक्त केली जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर अखिल भारताचे आराध्य दैवत आहे. पण मालवण येथे महाराजांचा पुतळा कोसळल्याने जगभरातील शिवप्रेमी व्यथित झाला आहे. प्रत्येक मराठी माणसाचा आणि शिवप्रेमीचा स्वाभिमान दुखावला गेल्याने समाजाच्या सर्व स्तरांतून आक्रोश व निषेध व्यक्त होत आहे. या पुतळ्याची सदोष आणि निकृष्ट दर्जाची निर्मिती करणारा जयदीप आपटे याला कायद्याच्या चौकटीत राहून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते दिग्विजय जेधे, शरद साळुंखे, अमोल गायकवाड, निलेश कथले, राकेश शेळके, केतन वायभासे, संदीप शिंदे, यश जेधे, आदित्या पोळेकर, सचिन दिवेकर, अक्षय दिवेकर, संदीप शितोळे, गणेश शितोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.