शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शांताराम कटके यांनी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अशोक पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिरूर-हवेली तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही दोन्ही बापू एकत्र आल्याचे यावेळी शांताराम कटके यांनी म्हटले आहे.
मंगळवारी वाघोली येथे कटके यांच्या निवासस्थानी त्यांनी आमदार अशोक पवार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. राजकारणात आपण इतकी वर्षे अजित पवार यांच्याशी निष्ठेने काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक सक्षम उमेदवार असताना अजित पवार यांनी शिवसेनेमधून उमेदवार आयात करत शिरूर व हवेलीकरांच्या माथी मारला आहे. हा उमेदवार अजित पवार व पक्षाच्या मूल्यांशी अजिबात संबंध नसल्याने आपण उमेदवारी मागे घेऊन आमदार अशोक पवार यांना पाठिंबा दिला आहे, असे कटके स्पष्ट केले आहे.
आमदार अशोक पवार यांची ताकद वाढली
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष भाऊसाहेब जाधव व शिवाजी कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार अशोक पवार यांना पाठिंबा जाहीर केला, तर मंगळवारी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी देखील पवार यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे अशोक पवार यांची ताकद वाढली आहे. माजी नगरसेवक शांताराम कटके यांचा वाघोलीसह हवेली तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे, तसेच ते राष्ट्रवादीचे उमेदवार ज्ञानेशवर कटके यांचे कट्टर विरोधक असल्याने याचा फायदा अशोक पवार यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.