पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष राहिलेल्या वसंत मोरे यांनी आज (दि.१२) पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वसंत मोरे यांच्यासारख्या निष्ठावान पदाधिकाऱ्याने साथ सोडल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसेला पुण्यात मोठा झटका बसला आहे. त्यांनी राजीनामा देऊन काही तास होत असतानाच आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकप्रकारे ‘ऑफर’च आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी मोरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. त्या म्हणाल्या, ‘वसंत मोरे यांचं पहिलं अभिनंदन. त्यांनी हा योग्य निर्णय आतातरी घेतला. कारण संघटनेमध्ये, पक्षामध्ये लोकहितासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता, त्याला काम करत असताना थांबवण्यासाठी करण्यात येणारे अडथळे या सगळ्या गोष्टी त्यांनी अनेक वर्षे सहन केल्या आहेत. मी म्हणेल हा निर्णय घ्यायला उशिर झाला. ‘लोकांची पसंत मोरे वसंत, पण मनसेला नव्हती पसंत’ म्हणून मला वाटतं त्याने दिलेला राजीनामा योग्य आहे.
तसेच ‘वसंतभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इथे तुझं स्वागतच असेल. पण निर्णय तुलाच घ्यायचा असेल. काम करत असणाऱ्या नेत्याला जिथे वाव मिळेल, सन्मान मिळतो. तिथे प्रत्येकजण प्रवेश करतो. खूप खूप शुभेच्छा, भवितव्यासाठी आणि तुझी जी लढाई सुरू आहे ती अशीच सुरू ठेव’, असेही त्यांनी म्हटले आहे.