पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे आणि त्यांच्या एका साथीदारावर पक्षातील कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १२) तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तुषार जयसिंग गाडे (वय-३२, रा. करवीर हौसिंग सोसायटी, जी ब्लॉक, एमआयडीसी, शाहुनगर, चिंचवड, पुणे) या तरुणाने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे (वय-४०, रा. पिंपळे निलख, पुणे) आणि त्यांचे सहकारी किरण जोगदंड (वय-३४, रा. विठ्ठलनगर, लांडेवाडी) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते तुषार जयसिंग गाडे यांनी दिलेल्या तक्रारीत कामठे आणि त्याचा साथीदार किरण जोगदंड यांच्यावर शारिरीक हल्ला आणि धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेने पक्षांतर्गत आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी वाढत चालल्याची दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि दोन्ही आरोपी एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. दरम्यान, फिर्यादी गाडे यांनी कामठे यांच्या कार्यकर्त्याला कार्यक्रमास न येण्याची धमकी विरोधात व्हॉट्स अॅप ग्रुपवर पोस्ट टाकली होती. त्यामुळे जोगदंड यांनी त्यांना शिवीगाळ केली.
गाडे पुन्हा व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये सामील करताना जोगदंड यांनी मागील वेळेसारखे कोणतेही वेडेचाळे करू नये, अशी सूचना केली होती. त्यावर फिर्यादी म्हणाले की, तुषार आणि मी मित्र आहोत, आपण आपसांत समजूत काढू. याचा राग आल्याने जोगदंडने भेटून चापट मारली. तसेच, कामठे यांनीही त्यांना फोनवर धमकी देत माझ्या कार्यक्रमाला येऊ नकोस अन्यथा बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.