पिंपरी: राज्यात महायुती सत्तेत येऊन राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नव्हता. या विस्तारात मंत्रिपदी मावळ मधून सुनील शेळके तसेच पिंपरीतून अण्णा बनसोडे, चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे या आमदारांपैकी कोणाची तरी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्यातरी मंत्रिपदी कोणाचीच वर्णी लागली नसल्याने कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदारांना मंत्री पदाचे वेध लागले होते. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि आमदार अण्णा बनसोडे हे मंत्री पदाच्या शर्यतीत होते. पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद मिळावं, यासाठी काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडला होता. शहराला न मिळालेले मंत्रीपद यंदा मिळायला हवेच अशी आग्रही भूमिका शहर भाजपने घेतली होती. पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत आम्ही बूथ लेव्हल वर सर्वोत्तम कामगिरी भाजपने केली असल्याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडला होता.
ही कामगिरी पाहता शंकर जगताप आणि महेश लांडगे या दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यायला हवं, अशी कार्यकत्यांची मागणी होती. तसेच मावळ विधानसभेतून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे सुनील शेळके मोठ्या मताधिक्क्याने ते दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यामुळे यंदा ते मंत्री होणार अशा आशयाचे बॅनरही लागले होते. मात्र संधी न मिळाल्याने मावळातील कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पुढील काळात उपमुख्यमंत्री अजित पवार मावळ तालुक्यात लक्ष देतील, अशी अपेक्षाही कार्यकत्यांनी व्यक्त केली आहे.