पुणे : आईचे आजारपण चालू असताना एकाच वर्षात आजोबा व वडिलांचे निधन झाले. तिच्या पायाखालची वाळू सरकली. आभाळ फाटले. पण दुःखाला फार काळ कवटाळून न बसता वयाच्या 20 व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली. 25 म्हशींच्या गोठ्याचे मॅनेजमेंट स्वतःच्या खांद्यावर घेतले. म्हशींच्या धारा काढताना भल्याभल्यांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात. कोणाचा विश्वास बसणार नाही पण दौंड तालुक्यातील एक रावडी मुलगी स्वतः म्हशीचे दूध पिळत रोज 150 लीटर दूध काढते. पहाटे साडेतीन ते रात्री साडेअकरा अशी गोठ्यात राबणारी ‘वैष्णवी अनिल रावडे’.
शिंदेवाडी ( ता.दौंड ) येथील अनिल रावडे यांचा दुध व्यवसाय होता. त्यांना वैष्णवी व साक्षी अशा दोन मुली आहेत. या दोघी भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे शिकत असताना वडिलांना गोठ्याचे व्यवस्थापन बघण्यात मदत करीत असे. वडीलांनी दोघींना धारा काढायला शिकवले होते. कबड्डीच्या मैदानातही या सरस आहेत. यांनी कुमार राज्य कबड्डी स्पर्धा व महापौर चषक कबड्डी स्पर्धा गाजविल्या आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये अनिल रावडे यांचे निधन झाले. कितीही अडचण आली तरी गोठ्यात कामाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्या लागतात. अनिल यांच्या निधनानंतर गोठ्याची जबाबदारी वैष्णवी व साक्षीने तातडीने खांद्यावर घेतली. खेळण्या बागडण्याच्या वयात कुटुंबाचे समर्थ नेतृत्व त्या करत आहेत. वडील असताना गोठ्यात 25 म्हशी होत्या. आता 30 म्हशी आहेत. तसेच त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. धाकटी बहीण साक्षी (वय 19) ट्रॅक्टर, चारचाकी, बुलेट चालवते. ट्रॅक्टरने नांगरट करणे, सरी काढणे, पाळी घालणे, काकरणे अशी कामे करते. अगदी फडात ऊस तोडणे व मका काढणे. ट्रॅक्टरमधून वाहून घरी आणणे. त्याची कुट्टी करणे, आंबवण, शेण काढणे ते वाळवणे, ऊस लागवड करणे, दारी धरणे, पिकांवर औषध फवारणी, म्हशींची खरेदी विक्री ही सर्व कामे या दोघी बहीणी करतात.
यांच्या मदतीला एक मजूर आहे. आई आजारपणामुळे फक्त देखरेख करते. गोठ्यांच्या व्यवस्थापनात शेजारी राहणारे चुलते राजेंद्र रावडे या दोघींना मदत करतात. सोशल मीडिया व टिव्हीसमोर या क्वचितच असतात. राजमाता जिजाऊ कब्बडी संघातून वैष्णवी व साक्षी खेळत आहेत. संघाचे मालक राजेंद्र ढमढेरे मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे वयाच्या 14-15 व्या वर्षी या ओपन गटातून कब्बडी खेळल्या आहेत. साक्षी पुणे येथे शारिरीक शिक्षणाची पदवी घेत आहे.
मुली व्यवसाय व कबड्डीचे मैदान गाजवत आहेत. त्याचे समाधान आहे. मुलगा नसल्याची कधी खंत नाहीयेय. पुरूषांना लाजवणारे कष्ट माझ्या मुली करत आहे. पतीच्या निधनानंतर दीर राजेंद्र रावडे व अनिल यांच्या मित्रांनी आधार दिला.
-राधिका रावडे, वैष्णवी आणि साक्षीची- आईमुलींनी खाकी वर्दीची नोकरी करावी हे वडिलांचे स्वप्न होते. साक्षीसाठी कुटुंबाची जबाबदारी मी घेतली. मी बारावी नंतर माझे शिक्षण थांबवले आहे. साक्षीला स्पर्धा परीक्षेत उतरवून वडिलांचे स्वप्न साकार करावयाचे आहे. तीला यशाच्या शिखरावर पोहोचलेले मला पाहायचे आहे.
– वैष्णवी रावडे, साक्षीची बहिण.