पुणे प्राईम न्यूज : समाजात काही व्यक्तींच्या आयुष्यात काटेरी वाटा असतात. त्याही परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्गक्रमण करत आयुष्याला वेगळी कलाटणी देणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्या इतक्या असतात. अंपग आई आणि शेतात मजुरी करणारे वडील त्यात ‘ती’ व तिचे तीन भाऊ असा प्रापंचिक वेदनांनी ग्रासलेल कुटूंब. आई सोबत ‘ती’ ने दारोदारी भटकंती करुन पोटाची खळगी भरायची. पण ही देखील परिस्थिती बदलेल अशी भावना समोर ठेवून पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. शास्ताबाद ( ता. शिरूर ) येथील शितल आइस्ता भोसले हिने पहिल्याच भरतीत पुणे शहर पोलिस म्हणून यश मिळवले. गेल्या साडेनऊ वर्षात पोलिस खात्याची सेवा करत ती कुटूंबाचा आधार बनलेली नवदुर्गा ठरली आहे.
शिरूर तालुक्यातील शास्ताबाद अगदी कमी लोकवस्तीचे गाव आहे. येथे पारधी समाजातील भोसले कुटूंब आपल्या परिवारा सोबत वात्सव्याला होते. आई अपंग तर वडील शेतमजुरी करून शितल व तिचे लहान तीन भाऊ प्रपंचाचा गाडा हाकत होते. शितल ही सगळ्यात मोठी असल्याने भावांची तिच्यावर नेहमीच जबाबदारी असायची. उपासमारीवर त्यांनी अनेक दिवस काढले. त्यामुळे वेळप्रसंगी अपंग आईसोबत शितल ला परिसरात दारोदारी भटकंती करुन जीवन जगण्याची वेळ आली होती. त्यातून पारधी समाजाला गुन्हेगारी जगतातला समाज असल्याचे समजले जाते. त्यामुळे सहसा त्यांना कोणी जवळही करत नाही. वडीलांना मजूरी च्या कामात मदत करत भावांना शाळेची गोडी लावण्याचे काम शितल ने केले. शितलचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शास्ताबाद येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूल जावे लागले. येथील शिक्षकांनी सायकल, पाठ्यपुस्तके व इतर सुविधा देत तिला पाठबळ दिले. हलाखीची परिस्थिती असून देखील शिक्षण थांबवायचे नाही. हा विचार घेऊन शितल ने कष्टाने व जिद्दीच्या जोरावर 12 वीचे शिक्षण त्या नंतर पदवीचे शिक्षण पुर्ण केले. पुढे तिने एम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
पोलिस भरती निघाली त्यावेळी शितल ने पुणे येथे जाऊन धावण्यास सुरूवात केली. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात शितल ला यश मिळाले. प्रशिक्षण होऊन तिची नेमणूक पुणे मु्ख्यालयात नियंत्रण कक्षात झाली. या गरीब कुटूंबाला सुधारण्याची संधी यातून मिळेल अशीच भावना यावेळी सगळ्यांची झाली होती. परिस्थीतीचे चटके खाणाऱ्या शितल च्या चेहऱ्यावर सुंगधीत फुला सारखा टवटवीतपणा आला होता. त्यातून पोलिस खात्यात सेवा करत कुटूंबाला आधार बनण्याचे तिने ठरविले. त्यानंतर तिने आईच्या अंपगत्वावर शस्त्रक्रिया केली. मात्र हवा तसा उपाय झाला नसला तरी आईच्या म्हतारपणाची काठी बनण्याचे तिने ठरविले. त्यामुळे सुट्टीत गावी आली की ती आईची सेवा करताना दिसते.
मुलगी शिकली,प्रगती झाली…!
शिक्षण घेतल तर आपल अज्ञान दुर होईल. परिस्थिती बदलेल आणि शिक्षणामुळे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला संधी मिळेल. घरातील एक मुलगी शिकली तर कुटूंब सुधारते हे तिने प्रत्यक्षात उतरविले आहे. तिचा भाऊ महेश 12 वी होऊन होमगार्ड मध्ये काम करत आहे. पंकज ने एस वाय बी.ए. पर्यतचे शिक्षण घेऊन होमगार्ड मध्ये कार्यरत आहे. या दोघांनी पोलिस भरतीसाठी सराव सुरू केला असून बहिणीच्या इच्छेप्रमाणे हे दोघे देखील लवकरच पोलिस भरती होतील अशी तिला आशा आहे. विकास हा विज्ञानाची पदवी घेत असून त्याने वेगळ्या क्षेत्रात करीअर करण्याचे ठरविले आहे.
जीवनात सुख दुखाःची परिस्थिती नेहमी बदलत असते. त्यासाठी जिद्द व कष्ट करण्याची ताकद असणे गरजेचे आहे. मागील काळातील घडामोडी दुर्लक्षित करण्याबरोबर भविष्यात यश संपादन करताना त्या प्रोत्साहीत कशा बनतील हे पाहिले पाहिजे. हे देखील दिवस जातील आणि सुखाचे दिवस येतील. अशीच भावन नेहमी होते. असे सांगत असतानाच शितल चे डोळे भरून आले होते.