राहुलकुमार अवचट / यवत : गेल्या नऊ दिवसांपासून संपूर्ण देशात उत्साहाने व भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त यवत येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या रावण दहनाने नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आली.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ, यवत, पिंपळगाव, पाटस, केडगाव यांसह अनेक ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दौंड तालुक्यातील देवीच्या प्रमुख मंदिरांपैकी कुरकुंभ येथील फिरंगाई माता, तर यवत येथील श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. यवत गावची ग्रामदेवी व महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेचे नवरात्र उत्सव हा नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी नऊ दिवस विविध रुपातील आकर्षक पुजेची मांडणी करण्यात आली होती.
घटस्थापना ते दसरा या कालावधीत अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीनिमित्त मंदिरात भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला. तर गावातील श्री तुकाई माता मंदिर, व श्री काळभैरवनाथ मंदिर, आनंदग्राम सोसायटी येथे देखील पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराला केलेली विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षक ठरली.
श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने भजन, गरबा – दांडिया, किर्तन, होम मिनिस्टर, देवीची मिरवणूक, गोंधळ, लावणी कार्यक्रमांसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज दसरानिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिर येथून सीमोल्लंघनासाठी पालखी काढण्यात आली. पालखीचे श्री महालक्ष्मी मंदिरात आगमन झाल्यानंतर देवीची आरती करून रावण दहन करून नवरात्र उत्सवाची सांगता झाली.
यावेळी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, ह.भ.प. महादेव महाराज दोरगे, सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, कुंडलिक खुटवड, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, काळभैरवनाथ देवस्थानचे सतीश दोरगे, शंकर दोरगे, महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके यांसह आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य, ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.